मुंबई : आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन प्रतिस्पर्धी संघांमध्ये पार पडला. दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला. मात्र, या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू साहिबजादा फरहानने दमदार अर्धशतक झळकावल्यानंतर केलेल्या सेलीब्रेशनमुळे वाद सुरू झाला आहे.
साहिबजादा फरहानने केलेल्या वादग्रस्त सेलिब्रेशनवरून भारतातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. साहिबजादा फरहानने मैदानावरच आपल्या बॅटने बंदुकीने गोळीबार करण्यासारखी ॲक्शन केली. या सेलिब्रेशनवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान या समान्यावरून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे. पाकड्यानी निरपराध भारतीय पर्यटकांना असे मारले हेच त्याने त्याच्या कृतीतून दाखवले, हे बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी लज्जास्पद असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
आजच्या भारत पाकिस्तान सामन्यात हे घडलं, साहिबजादा फरहान याचं अर्ध शतक होताच त्याने मैदानात 47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची एक्शन केली. पाकड्यानी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता. बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे. भारताचे लष्कर आणि पुलवामा पहेलगाममध्ये मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे, अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह महान आहेत!, अशा शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
साहिबजादा फरहानने नेमकं काय केलं?
साहिबजादा फरहानने पाकिस्तानला पॉवरप्लेमध्ये दमदार सुरूवात करून दिली आणि 34 चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने वादग्रस्त सेलिब्रेशन करत मैदानात खळबळ उडवली. फरहाननं मैदानावरच आपल्या बॅटने बंदुकीने गोळीबार करण्यासारखी ॲक्शन केली. या सेलिब्रेशनमुळे त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तसेच आयसीसीने त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे.